Maharashtra Rain : सप्टेंबरची चांगली सुरुवात करणाऱ्या पावसानं अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला आणि सर्वांच्याच चिंतेत भर पडली. ऐन पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळं ऋतुचक्रच गडबडल्याची बाब सर्वांच्या लक्षात आली. असं असतानाच यंदा हा पाऊस रडवणार वाटतं... ही शक्यता गडद होत असतानाच पाऊस परतला. तो आला, चिंब बरसला आणि पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला. असा हा पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात जोर धरताना दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात शुक्रवार, 15 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात होणार आहे. राज्याचा बहुतांश भाग हा पाऊस व्यापणार असून त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा जोर जास्त असेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 


बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. दरम्यानच्या काळात कोल्हापूर, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मुंबईसह नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक सरीची बरसात पाहायला मिळेल. कोकणात एकिकडे गणेशोत्सवाची लगबग सुरु झालेली असतानाच दुसरीकडे पाऊसही जोर धरणार आहे. त्यामुळं पावसासाठीची व्यवस्था करूनच पुढच्या कामांची आखणी केलेली उत्तम. 


हेसुद्धा वाचा : सावधान! बाजारात विकली जातायत कॅन्सरवरची नकली औषधं, सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा


 


हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 14 सप्टेंबरपर्यंत कोकणाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल. पण, त्यानंतर मात्र तो पुन्हा सक्रिय होऊन याचा परिणाम कोकण, कोल्हापुरासह पश्चिमेकडील घाटमाथ्यावरील परिसरावर दिसून येणार आहे. 


बंगालच्या उपसागरात चक्रिय वाऱ्यांची स्थिती... 


देशाच्या उत्तर भागासह बंगालच्या उपसागरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळं या वाऱ्यांचं रुपांतर पुढे कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हा कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या दिशेनं सरकण्याचा अंगाद असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पर्जन्यमानावरही होताना दिसणार आहे. थोडक्यात या आठवड्याचा शेवट पावसानं होणार असून, यादरम्यानच्या काळात गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याते बेत असतील तर, पावसाची तयारी करूनच निघा.