Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसानं मुंबई आणि नवी मुंबई भागात काहीशी उसंत दिली. असा हा पाऊस तिथं कोकण आणि विदर्भात मात्र मुसळधार बरसताना दिसला. इतका, की शनिवारी नागपुरात झालेल्या पावसानं शहरातील बहुतांश भागात पाणी साचलं.असा हा पाऊस आता टप्प्याटप्प्यानं त्याच्या परचीचा प्रवास सुरु करणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. असं असलं तरीही हा पाऊस कोकण आणि विदर्भातून मात्र इतक्याच काढता पाय घेणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 


कोकणात दमदार पाऊस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळकोकणासह कोकणातील इतर भागातही पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. पुढचे दोन दिवस कोकणातील काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी तर काही भागांमध्ये तुरळक सरी पाहायला मिळणार आहेत.


गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तरं मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यानं इथली वाहतूक संथ गतीनं सुरु असलेली पाहायला मिळाली. या साऱ्यामध्ये शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला. पावसाची राज्यातील एकंदर स्थिती पाहता 29 सप्टेंबरपर्यंत हा पाऊस कायम राहणार असून धीम्या गतीनं त्याचा जोर ओसरताना दिसणार आहे. 


हेसुद्धा वाचा :2024 निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, 'या' प्रमुख पक्षाने NDA तून बाहेर पडण्याची केली घोषणा


 


तिथं विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस मनसोक्त बरसला. तर, नाशिक, संभाजीनगरमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. येत्या 24 तासांमध्ये नांदेड, लातूरलाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


मान्सूनच्या परतीचा प्रवास... 


मंगळवारपासून मान्सून परतीच्या प्रवासाला लागणार असून याची सुरुवात उत्तर भारतापासून होणार आहे. इथं राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरानं झाल्यामुळं त्याच्या परतीचा प्रवासही उशिरानं म्हणजेच 10 ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. थोडक्यात राज्यात सध्या मान्सूनचाच पाऊस सुरु असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तिथं देशाच्या उत्तरेकडे आतापासूनच हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून, थंडीची हलकी चाहूलही मिळत आहे.