Maharashtra Rain : गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात वरुणराजे जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने नदी नाले तुंडूब भरले आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली. शहरातील अनेक भागात पाणी साचलं. कुठे पिकांना पावसाने बहर आली आहे तर काही ठिकाणी पिकांना पावसाचा फटका बसला आहे. आज रविवारची सुट्टी अशात तुम्ही पावसात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.  हवामान विभागानं (IMD) नुसार राज्यात आजही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  (maharashtra rain news yellow alert vidarbha konkan imd today Rain updates latest news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय संपूर्ण विदर्भाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रविवार असल्याने बाहेर पडणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान पुढचे 3-4 दिवस राज्यात पावसात जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र 2 ऑगस्टच्या जवळपास राज्यात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. 


रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं भाताची रोपं कुजून गेली आहेत. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं आणि त्यात रोपं बुडून राहिल्यानं ती पार कुजून गेली. पाणी ओसरल्यावर शेतक-यांना हे नुकसान दिसून आलं.


नाशिकच्या सुरगाण्या मुसळधार पाऊस झालाय.. या पावसाने पिंपळसोंड येथील भुतकुड्याच्या ओढ्यावरील पूल वाहून गेलाय. त्यामुळे इथल्या गावक-यांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय..तालुक्याला जाण्यासाठी इथले गावकरी जीव धोक्यात घालून हा नाला ओलांडत आहेत.. पुला अभावी गावक-यांना आरोग्यासह इतर सुविधांपासून वंचित राहावं लागतंय... वाहून गेलेला पूल तातडीनं बांधावा अशी मागणी इथल्या गावक-यांनी केलीये.


वाशिमच्या मानोरा आणि कारंजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती आणि घरांची खासदार भावना गवळींनी पाहणी केली..यावेळी नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देण्याचे निर्देश भावना गवळींनी अधिका-यांना दिले. तसंच नदीवर तातडीनं संरक्षक भिंत बांधून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.


चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्यासोबत बोटीतून या भागाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. शहराच्या सखल भागातील नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखण्याची गरज जोरगेवारांनी यावेळी बोलून दाखवली. 


राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी, काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे पंचनाम्यात अडकून न पडता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून सरकारी मदत केली जावी. त्यामुळेच नुकसानग्रस्त शेतकरी वाचतील अशी प्रतिक्रिया वडेट्टीवरांनी दिली. 


छत्तीसगडच्या काही जिल्ह्यांत पावसानं धुमाकूळ घातलाय. रायपूरमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन, वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. तसंच रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाऊस थांबला तरी इथल्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे जनजीवन अधिकच विस्कळीत झालं.