Maharashtra Rain : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सर्वसामान्य पर्जन्यमान असेल अशीच माहिती मान्सूनच्या आगमनावेळी हवामान विभागानं दिली होती. सरासरीची एकूण टक्केवारी पाहता साधारण 94 ते 95 टक्के पाऊस पडेल असंही सांगण्यात आलं होतं. पाऊस आला, जुन महिना गाजवला पण जुलै महिन्यात मात्र पावसानं दडी मारली. जुलैच्या अखेरीस पाऊस जो दिसेनासा झाला तो पुन्हा परतलाच नाही. असा हा पाऊस नेमका कधी परतणार हाच प्रश्न सर्वांना पडत असताना आता हवामान विभागानंच चिंता वाढवणारं वृत्त दिलं आहे. कारण, पुढचा आठवडा तरी राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिले काही दिवस राजच्याच्या बहुतांश भागांवर फक्त आणि फक्त काळ्या ढगांची चादरच पाहायला मिळेल. हे पावसाळी ढग सातत्यानं चकवा देतील. तर, कोकण, विदर्भासह राज्याच्या काही भागांवर फक्त श्रावणसरींचाच शिडकावा असेल. त्यामुळं शेतीच्या कामांचा वेग पुन्हा मंदावणार असून, बळीराजाची चिंता आणखी वाढणार आहे. 


सहसा ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर चांगलचा असतो. पण, यंदाच्या वर्षी मात्र पावसानं हिरमोड केल्यामुळं राज्यावर मोठं संकट ओढावण्याची चिन्हं दिसत आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार किमान पुढील पाच दिवस तरी मान्सनच्या परतण्यास परिस्थिती पूरक नाही. त्यामुळं 1920 आणि 1965 नंतरचा हा सर्वात कमी पाऊस झालेला ऑगस्ट महिना ठरणार आहे. 


आकडेवारी पाहून डोकं धराल 


मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट महिन्यांमध्ये सरासरी 772.4 मिमी बरसतो. पण, यंदा मात्र हे प्रमाण 709.5 मिमी इतकंच आहे. विदर्भात सरासरीहून 9 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, सांगली आणि जालन्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. मध्य महाराष्ट्राची तुलना करायची झाल्यास इथं दरवर्षी 560 मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा हे प्रमाण तब्बल 444.3 मिमी इतकं खाली आलं आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे ज्यामुळं परिस्थिती येत्या काळात आणखी भीषण होण्याची चिन्हं सध्या पाहायला मिळत आहेत. 


हेसुद्धा वाचा : मी पण कोकणातलाच आहे; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा देत 'त्याची' औकात काढली


दरम्यान महाराष्ट्रात परिस्थिती दिवसागणिक भीषण होत असतानाच देशाच्या काही राज्यांमध्ये मात्र सोमवारपासून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या भागांमध्येही पावसाची चांगली हजेरी असेल.