Maharashtra Rain : हिरमोड! ऑगस्टमध्येही समाधानकारक पाऊस नाहीच; विदर्भाला मात्र यलो अलर्ट
Maharashtra Rain : जुलैप्रमाणंच ऑगस्ट महिन्यातसुद्धा महाराष्ट्रात पाऊस चकवा देणार आहे. कारण, पहिले पंधरा ते वीस दिवस उलटूनही पावसानं काही परतीची वाट धरलेली नाही.
Maharashtra Rain : राज्यातून मान्सूननं आवरतं घेण्यास सुरुवात केली की काय? मागील काही दिवसांपासून सुरु असणारी पावसाची ये-जा पाहता अनेकांनाच हरा प्रश्न पडला आहे. त्यातच आता श्रावणसरी सुरु झाल्यामुळं तसं पावसाचं प्रमाण बेताचच. जुनच्या अखेरी मनसोक्त बरसणारा हा पाऊस जुलै आणि ऑगस्ट अर्धा संपला तरीही परतलेला नाही. त्यामुळं हवामान विभागानंही चिंता व्यक्त केली आहे. एरव्ही कोकणात पावसाचं असं चित्र कधीच पाहायला मिळालं नाही. पण, यंदा मात्र कोकणाच्या तुलनेत विदर्भातच जास्त पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं.
नव्या आठवड्याच्या हवामानाबाबत सांगायचं झाल्यास सोमवारी विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम राहील. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ. अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यातील येत्या दिवसांमध्येही पाऊस पडणार नसल्यामुळं आता पावसासाठी थेट सप्टेंबर महिन्याचीच वाट सर्वांना पाहावी लागणार आहे. सध्याच्या घडीला निर्माण होणारं कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांच स्थिती पाहता ही परिस्थिती उदभवली आहे. कारण, वाऱ्यांची ही स्थिती मध्य प्रदेशच्या दिशेनं सरकली असून, ते गुजरातच्या दिशेनं सरकलं असल्यास महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला असला असता. परिणामी सध्यातरी विदर्भच पावसाच्या शिडकाव्यानं सुखावताना दिसणार आहे.
कोकणात पाऊस कधी?
विदर्भात बरसणारा हा पाऊस पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक स्वरुपात बरसेल. त्यामुळं इथंही सप्टेंबर उजाडण्याचीच परिस्थिती निर्माण झावी आहे. पावसाचं कमी झालेलं प्रमाण पाहता देशातील सरासरी आकडेवारी 93 टक्के, तर महाराष्ट्रात ती 95 टक्क्यांपर्यंत उतरली आहे. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात मान्सूनच्या वाऱ्यांना वेग मिळून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्णपणे सक्रिय होतील.
हेसुद्धा वाचा : वेड्या बहिणीची वेडी माया! अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात; टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं
पाऊस कमी होण्यामागची कारणं काय?
यंदाच्या वर्षी पावसावर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता मात्र समुद्रासोबतच वातावरणातील हवेचं प्रमाणही वाढलं. त्यामुळं पावसाच्या संपूर्ण प्रक्रियेवरच याचे थेट परिणाम झाले. असं असलं तरीही इंडियन ओशन डायपोल सक्रिय होत असल्यामुळं भारतीय मान्सूनला याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.