पुढील 48 तासांसाठी राज्याच्या `या` भागांत `मौसम मस्ताना`; पाहा कुठे बरसणार पाऊसधारा
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं जोर वाढवलेला असला तरीही काही भागांमध्ये मात्र सकाळच्या वेळचं तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Rain : पावसानं राज्याच्या बहुतांश भागांत हजेरी लावत सप्टेंबर महिन्यात मोठा दिलासा दिला. ज्यानंतर त्याच महिन्यात देशातील काही राज्यांमधून पावसानं काढता पाय घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातून मात्र अद्यापही परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झालेला नाही. उलटपक्षी राज्याच्या काही भागांना पावसाच्या धर्तीवर हवामान विभाग सतर्क करतानाच दिसत आहे. किंबहुना पुढील 48 तासांसाठीसुद्धा महाराष्ट्रात मुसधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीसह मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळू शकते. तर, सातारा, पुणे, सांगली पट्ट्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्याचं कळतं. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनासुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा एकंदर रोख पाहता शेतकऱ्यांनी भरीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
पावसाची एकंदर चिन्हं पाहता मुंबई शहर वगळता राज्याच्या काही भागांमध्ये मात्र सकाळच्या वेळी तापमान जास्त राहणार असून, समुद्रकिनाऱ्यानजीक असणाऱ्या भागामध्ये हवामान दमट असण्याची शक्यता असेल. साधारण 10 ऑक्टोबरनंतर राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरु होईल, ज्यादरम्यानही पावसाच्या सरींची बरसात होईल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : मध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार
देश पातळीवरील हवामान अंदाज...
खासगी हवामान संस्था स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, हिमालयाचं काही क्षेत्र, मेघालय, आसाम आणि पश्चिम बंदाल येथे काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पूर्वोत्तर भारतात अर्थात अंदमान, निकोबार बेट समुहासह दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगढ, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग इथं पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, देशाच्या अतीव उत्तरेकडे अर्थात जम्मू काश्मीर आणि हिमाचल पट्ट्यामध्ये वातावरणात मोठे बदल होणार असून, पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे.