Maharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, `या` जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय.
Maharashtra Rain : पाऊसधारा झेलणं कोणाला आवडत नाही? पण, यंदा मात्र या पावसानं तशी संधीही दिली नाही. अगदी लक्षात राहिल इतक्यांदाच काय तो छत्री आणि रेनकोटांचा वापर यंदा झाला असावा. कारण, जुलैच्या अखेरीपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्टचा संपूर्ण महिनाभर महाराष्ट्रापासून दूर राहिला. हो, पण या पावसानं आपण गेलो नाही याची खात्री करून देण्यासाठी अनेक जिल्ह्यांवर काळ्या ढगांचं सावट मात्र कायम ठेवलं. असा हा पाऊस आता राज्यात पुन्हा एकदा परतला आहे.
गुरुवारी नागपुरात दमदार पाऊस झाला. ज्यानंतर शुक्रवारपासून पूर्व विदर्भात 48 तासांचा ऑरेंज अलर्ट, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जारी केला आहे. भंडारा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती. इथं नदीनाले तुडूंब भरून वाहत आहेत. ऐन पोळ्याच्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला असून, धानपिकालाही नवीसंजीवनी मिळाली आहे.
मागील 24 तासांमध्येसुद्धा हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसानं चांगली हजेरी लावली. मुंबईतही पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. पावसाचे असेच तालरंग पुढील दोन दिवस तरी पाहायसा मिळणार आहेत. किंबहुना ठाणे, पालघर, मुंबईचा काही भआग आणि नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळेल. तर, राज्याच्या कोकण किनारपट्टी भागातही हा पाऊस सातत्यानं बरसत राहणार आहे. त्यामुळं गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग आलेला असतानाच हा पाऊसही त्यात त्याची हजेरी दाखवतोय असंच म्हणावं लागणार आहे.
हेसुद्धा वाचा : नवी मुंबई आणि नाशिकवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
आयएमडीच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडाऱ्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेडला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे आणि रायगड विभागालाही हवामान खात्यानं यलो अलर्ट देत सतर्क केलं आहे.
पुणे आणि सातारा भागातही पावसाची समाधानकारक हजेरी असेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. ज्यामुळं या भागाला लागून असणाऱ्या घाटमाथ्यावरील परिसरामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली असून, वादळसदृश परिस्थिती तयार झाली आहे.