राज्यात अतिवृष्टीची शक्यता, आता पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; कामाशिवाय घराबाहेर पडू नका !
Maharashtra Rain News Update : राज्यात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
पुणे, मुंबई : Maharashtra Rain Update : News राज्यात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघरमध्ये गेल्या 24 तासांत सरासरी 64 मिमी पाऊस झालाय. तर ठाणे जिल्ह्यातही गेल्या 24 तासांत 76.4 मिमी पाऊस झालाय. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात मुंबईतील कुलाबा येथे 52.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 49.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड आणि रत्नागिरीतील काही नद्या इशारा पातळीवरून वाहात आहेत.
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 8 जुलैपासून 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळावे तसेच पर्यटन स्थळे धबधबे या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा सागरी किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.