Maharashtra Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. उद्घाटनाला चोवीस तास उलटत नाहीत तोच समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची (Accident) नोंद झाली आहे.  वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात दोन्ही कारचं प्रचंड नुकसान झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातात सुदैवाने कोणीही जखमी नाही
आज दुपारी झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन केले होते आणि आज त्याच ठिकाणी अपघात झाला. 


डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं
समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) कौतुक केलं. 'आजच्या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात (Maharashtra) वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण 24 जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील' असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


समृद्धी महामार्गाचा 24 जिल्ह्यांना लाभ 
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.


पर्यटनवाढीलाही चालना 
समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी 24 ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते यांमुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरुळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत.


हे ही वाचा : Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?


कृषी समृद्धी केंद्रे आणि रोजगार 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 392 गावांना जोडणार आहे. पूर्णपणे ग्रीनफिल्ड असलेला समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी राज्य वा राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाईल, त्या ठिकाणी इंटरचेंजेस तयार केले जाणार आहेत. असे एकूण 24 इंटरचेंजेस समृद्धी महामार्गावर असतील. या 24 पैकी 18 इंटरचेंजेस नजीक कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. नियोजनबद्ध विकास हे या नवनगरांचे वैशिष्ट्य असेल. या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील, तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असतील. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा या नवनगरांमध्ये असतील एका कृषी समृद्धी केंद्रात 30 हजार थेट तर 60 हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत.


 समृद्धी महामार्गाची वैशिष्टये 
- लांबी 701 किमी -  एकूण जमीन : 8311  हेक्टर - रुंदी : 120 मीटर - इंटरवेज : 24 - अंडरपासेस : 700 - उड्डाणपूल : 65 - लहान पूल : 294 - वे साईड अमॅनेटीझ : 32 - रेल्वे ओव्हरब्रीज : 8 - द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : 150 किमी (डिझाइन स्पीड) - द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष - कृषी समृद्धी केंद्रे : 18 एकूण गावांची संख्या : 392 - प्रकल्पाचा अंदाजित खर्च: 55 हजार कोटी रुपये - एकूण लाभार्थी : 23 हजार 500 - वितरित झालेला मोबदला : 6 हजार 600 कोटी रुपये - कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : 356 - द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत - ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे