कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी लढवणार इतक्या जागा, पवारांची घोषणा
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात 125-125 जागांवर निवडणूक लढवणार
मुंबई : येत्या आठवड्यात कधीही विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होती. त्यामुळे सध्या युती आणि आघाडीच्या जागावाटपाची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपा-शिवसेनेने आपला जागावटपाचा कार्यक्रम गुलदस्त्यात ठेवला असला तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने तो जाहीर केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात 125-125 जागांवर निवडणूक लढवेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इतर जागा आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना देतील तसेच दोन्ही पक्षांच्या 15 ते 20 जागांमध्ये फेरबदल होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकींच्या जागावाटपासंदर्भात कॉंग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेचा विजयी अश्व रोखण्यासाठी यावेळी चर्चा झाली. राज्याच्या निवडणुकीला केवळ 2 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 288 जागांपैकी 122 तर शिवसेनेला 62 जागा मिळाल्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला क्रमश: 42 आणि 41 जागेवर समाधान मानावे लागले होते.