चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस
Maharashtra Board SSC Result 2024: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
Maharashtra Board SSC Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दहावीच्या एकंदरित निकालात 1.98 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी या निकालामधून एक धक्कादायक आकडेवारीही समोर आली आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. म्हणजेच मातृभाषा मराठी असलेल्या राज्यामध्येच दहावीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी अधिक कठीण जात असल्याचं दिसत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयातच गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षिणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
मराठी विषयाची परीक्षा दिलेल्यांची संख्या अन् आकडेवारी काय सांगते?
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत. मुंबई विभागामध्ये मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्यांची संख्या 1 लाख 6 हजार 256 इतकी होती. मात्र प्रत्यक्ष परीक्षेला 1 लाख 5 हजार 322 जण हजर होते. त्यापैकी 1 लाख 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच मुंबई विभागात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 670 इतकी आहे.
इंग्रजी भाषेत किती जण उत्तीर्ण?
दुसरीकडे इंग्रजी भाषेसंदर्भातील आकडेवारीवर नजर टाकल्यास असं दिसतं की इंग्रजी विषयाचा निकाल 98.12 टक्के इतका लागला. 3 लाख 59 हजार 229 विद्यार्थ्यांनी इंग्रजी (पहिली भाषा) परीक्षा दिली. त्यापैकी 3 लाख 52 हजार 491 जण उत्तीर्ण झाले. इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या 6 हजार 738 इतकी आहे. मराठीमध्ये नापास होणाऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.
हिंदीची स्थिती काय?
प्रथम भाषा हिंदी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 39 हजार 110 इतकी आहे. हिंदीचा निकाल 93.91 टक्के इतका लागला आहे. 36 हजार 729 विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण झाले असून 2 हजार 381 विद्यार्थी हिंदीच्या परीक्षेत नापास झालेत.
या विषयांचा निकाल 100 टक्के
दहावीच्या परीक्षेमध्ये एकूण 58 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 21 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. 100 टक्के निकाल लागलेल्या विषयांमध्ये हेल्थ केअर, शेती, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, प्लंबर जनरल, गुजराती, द्वितीय भाषा उर्दू, हिंदी-फ्रेंच, द्वितीय तसेच तृतीय भाषणा हिंदी-कन्नडा, हिंदी-तमीळ, हिंदी-मल्याळम, हिंदी-बंगली अशा जोड विषयांचा समावेश आहे.