सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  राज्यात मोठा शिक्षक भरती घोटाळा (Teacher recruitment scam) उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली. कारण यात चक्क महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) हिचाच समावेश होता.  शैलजा दराडेने 44 जणांना नोकरीचं आमिष दाखवून 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे. आपल्या भावाच्या मदतीनं नोकऱ्यांचं गौडबंगाल करत तिने ही माया जमवल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात शैलजा दराडेला अटक (Arrest) करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी केली तरूणांची लूट?
शैलजा दराडे आणि तिचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 44 तरूणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप आहे. दादासाहेब दराडे हा आपली बहिण शिक्षण विभागात अधिकारी असल्याचं सांगून तरूणांना नोकरीचं आमिष दाखवायचा. हडपसरमधील पोपट सूर्यवंशी यांच्याकडून त्यानं 27 लाख रूपये घेतले. नोकरी मिळत नसल्यानं सूर्यवंशींनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि या भावा-बहिणीचं बिंग फुटलं. चौकशीतून या दोघांनी 44 जणांना तलाठी, आरटीओ परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन 5 कोटी स्वीकारल्याचं समोर येतंय. 


प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून शैलजा दराडेने भाऊ दादासाहेब याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत ऑगस्ट 2020 मध्ये तशी जाहीर नोटीसही दिली होती. दरम्यान याप्रकरणाशी संबंधित काही व्हॉईस कॉलही पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केलीय. आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे फसवणूक झालीय? दराडेंनी इतक्या पैशांचं काय केलं? या घोटाळ्यात अजून काही बड्या धेंडांचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे. त्यामुळे दराडे भावंडांचे आणखी काळे कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. 


आधी सूपेला अटक
धक्कादायक म्हणजे शैलजा दराडेच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यालाही टी ई टी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेकडे सोपवण्यात आला. पण शैलजा दराडे घोटाळ्यात सुपेच्या पुढे गेली. शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडेबाईने कोट्यवधींचा घोटाळा केला.


या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप बाहेर आली होती. फक्त शिक्षण विभागातच नाही तर आरटीओमध्ये नोकरी लावून देण्याचं आमीषही दिलं जात होतं. यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केल्याचं या ऑडिप क्लिपमध्ये होतं.