Maharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?
H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष...
H3N2 Latest Update: महाराष्ट्रात H3N2 इंन्फ्लूएन्झा विषाणूचे वाढते रुग्ण पाहता राज्य शासन सतर्क झालं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये राज्यातील एकंदर परिस्थिती, उपलब्ध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चा होऊ शकते. इतकंच नव्हे, तर मास्कसंदर्भातील निर्णयही घेतला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.
प्राथमिक स्तरावर राज्यात वाढणारा कोरोना आणि H3N2 चा धोका पाहता आरोग्य विभागाकडून मास्क बंधनकारक केला जाऊ शकतो. शिवाय पुन्हा एकदा हात स्वच्छ ठेवणं, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात ठेवणं आणि सुरक्षित अंतर ठेवून वावरणं असे नियम लागू केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केंद्र शासनानं दिली महत्त्वाची माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार हवमानातील बदलांमुळं ओढावलेल्या या व्हायरसचा प्रभाव आणि त्यामुळं आलेली आजारपणं या साऱ्याचा प्रादुर्भाव मार्च महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येण्याची आशा आहे. आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी अशा लक्षणांसह उदभवणारं आजारपण हे जास्तीत जास्त आठवडाभरासाठी टिकून राहू शकतं. पण, लहान बालक, वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर महिला किंवा सहव्याधी असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत काळजी घेतली जाणं अपेक्षित आहे. थोडक्यात आजारपण अंगावर काढू नका असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
मुंबईत 15 दिवसांत 53 रुग्ण
मार्च महिन्यात पहिल्या 15 दिवसांत एकट्या मुंबईमध्ये H3N2 विषाणूचा संसर्ग होणाऱ्या 53 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते मार्च या 75 दिवसात H3N2 चे तब्बल 118 रुग्ण आढळले आहेत. इथं दिलासादायक बाब म्हणजे, अद्याप एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
हेसुद्धा वाचा : Mumbai Rain : मुंबईत पुढील 3- 4 दिवस पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना
सध्या मुंबईत H3N2 विषाणूच्या 32 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये वॉर्ड ई, डी, एफएस, एफएन, जीएस, आणि जीएन हायरिस्क झोन या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यापैकी चार रुग्ण H3N2 तर 28 रुग्ण H1N1 चे आहेत. यापैकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. सर्व बीएमसी दवाखाने, 17 खासगी दवाखाने, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि कस्तुरबा रुग्णालयात 24 तासांच्या आत ताप कमी होत नसल्यास सर्व संशयित रुग्णांवर ओसेल्टामिवीरने उपचार केले जात असल्याची माहिती मिळत आहे.