सावंतवाडी : सिंधुदुर्गात राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जवळच्या व्यक्तींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त आहे. त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. मात्र, दबक्या आवाजात याची चर्चा आहे. दरम्यान, कुडाळ तालुक्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. मात्र याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. असे असले तरी तिघांनी राजीनामे दिल्याचे समजते आहे. राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याने नाराज लोकांनी आपल्या पदाचा त्याग केल्याचे खात्रीशील  वृत्त आहे. त्यामुळे राणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकास कुडाळकर, दादा साईल आणि दीपक नारकर  अशी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी शुक्रवारी कुडाळ महाराष्ट्र स्वाभिमान कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी काहींना त्यांनी कानपिचक्या दिल्याचेही बोलले जात आहे. त्यातच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी शनिवारी आपल्या पदाचे अचानकच राजीनामे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्याकडे पाठवले. सामंत यांच्यामार्फत थेट पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे धाडण्यात आले आहेत. तडकाफडकी राजीनामे का पाठवले याचा उलगडा झालेला नसला तरी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे नाराज पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 


राणेंची भूमिका काय आहे?


दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्या काँग्रेस पक्षात परतण्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत राणेंनी अद्याप अधिकृत भूमिका मांडलेली नव्हती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. आज राणे यांनी झी मीडियाशी बोलतना काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. तर शिवसेना - भाजप यांच्यात युती झाली तर आपण स्वतंत्र विचाराचा आहे. सिंधुदुर्ग - रत्नागिरीतून नीलेश राणे हेच लोकसभेचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे राणे हे काँग्रेस आघाडी सोबत असतील, हे ही  वृत्त फेटाळून लावले आहे. तर दुसरीकडे राणेंची नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनामा समितीवर भाजपने नियुक्ती केली आहे. नाराज राणेंना खूश करण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची असल्याची चर्चा आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आश्वासन दिले आहे. दरम्यान, राणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी भाजपवर नाराज नाही. मी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे, असे मी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले आहे. त्यांची कालच भेट घेतली असल्याचे राणे यांनी सांगितले.