हेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे `मुन्नाभाई`मधल्या लकी सिंगसारखे प्रताप
मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे स्वत:चे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. इतकंच नाही तर जिल्हाधिकारी बनल्याचे फोटोही त्याने शेअर केले. त्यामुळे समाजात त्या तरुणाविषयी आदर वाढला होता. पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच होता. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : अभिनेता संजय दत्तचा 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट तुम्हाला आठवतोय. या चित्रपटातील बोमन इराणी म्हणजे चित्रपटातील लकी सिंगला वेगवेगवळ्या प्रतिष्ठित लोकांबरोबर फोटो काढून घेण्याचा छंद असतो. पण अशीच काहीशी घटना प्रत्यक्षातही घडली आहे. गोंदियातल्या एका तरुणाने आयएएस अधिकारी (IAS Officer) असल्याचं सांगत सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट केले. फोटो एडिट (Edited Photo) करत त्या तरुणआने नरसिंगपूरचा जिल्हाधिकारी (Collector of Narsinghpur) असल्याचा दावाही त्याने केला. इतकंत नाही तर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारतानाच फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला.
असा झाला पर्दाफाश
राहुल गिरी असं या तरुणाचं नाव असून तो गोंदियातला (Gondia) रहिवाशी आहे. राहुल गिरीने मध्यप्रदेशमधल्या (Madhya Pradesh) नरसिंगपूरच्या जिल्हाधिकारींच्या खूर्चीवर बसलेला स्वत:चा एक फोटो एडिट केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नगरसिंगपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत पोहचला. त्यानंतर राहुल गिरीचा बनाव उघडकीस आला. राहुल गिरी बीएससी उत्तार्ण आहे. त्याला आयएएस अधिकारी व्हायचंहोतं. पण त्याने तितकं शिक्षण घेतलं नाही. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोटो एडिट करून आयएएस झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत होता. यासाठी तो एका एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत हता.
नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत आरोपी राहुल गिरीची फोटो पोहोचल्यानंतर त्यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राहुल गिरीला महाराष्ट्रातल्या गोंदियामधून अटक केली. पोलिसांनी आरोपी राहुल गिरीचा मोबाईल ताब्यात घेतल्यावर त्यांना धक्काच बसला. राहुल गिरीच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहीमंत्री अमित शहा यांच्यासह विविध पक्षातील दिग्गज नेत्यांबरोबरचे एडिट केलेले फोटो होते. यातले काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्टही केले होते. या फोटोचा त्याने काही गैरवापर केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यात लाचखोर अधिष्ठाताविरोधात आंदोलन
दरम्यान, पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी 16 लाखांची लाच घेणारा अधिष्ठाता डॉ आशिष बनगिवार याला निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी अभाविपनं आंदोलन केलं. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान लाचखोर अधिष्ठाता डॉक्टर आशिष बनगिवार याला न्यायालयाने बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणांमध्ये कॉलेजच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या बाबींचा सखोल तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविपने केलीय