`बेटा पानी मे मत जा...` आईचा तो व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा... जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू
Jalgoan : शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशियात नदीत बुडून मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी यातल्या एका विद्यार्थाचं आईबरोबर व्हिडिओ कॉलवर शेवटचं बोलणंही झालं होतं. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात होते.
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) तीन विद्यार्थ्यांचा रशियात नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. हे तीनही विद्यार्थी रशियातील (Russia) यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत होते. हे विद्यार्थी व्होल्का नदीच्या किनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी ही दुर्देवी घटना घडली. चार जून रोजी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली. तिथल्या पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. तीन ते चार दिवसांनी नदीत बुडालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव इथं राहाणारा हर्षल अनंतराव देसले, अंमळनेरमध्ये राहाणारा जिशान अश्फाक पिंजारी आमि जिया फिरोज पिंजारी अशी मृतांची नावं आहेत. मृत विद्यार्थी आपल्या काही विद्यार्थी मित्रांसह व्होल्का नदीच्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते.
आईचा तो शेवटचा व्हिडिओ कॉल
मंगळवारी रात्री जेवण करण्यासाठी बाहेर पडले. व्होल्का नदीकाठावरील चौपाटीवर थोडा वेळ घालवला. तिथं जिया नदीपात्रात उतरली. यावेळी जिशानने आईला व्हिडिओ कॉल (Video Call) केला आणि जिया पाण्यात उतरल्याचं दाखवलं. आईने जिया पाण्यातून बाहेर येण्यास सांगितलं. जिशान बेटा तू पाणी मे मत जा, और जिया को भी बाहर निकाल और जलदी घर पहुँचो, असं आईने सांगितलं. याव हा अम्मी असं म्हणत जिशानने फोन बंद केला. हाच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. नदीत पाण्याची लाट आल्याने जिया आणि जिशान वाहून गेले. त्यांच्यासोबत हर्षल देसले हा विद्यार्थीही नदीत वाहून गेला. या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
नदी किनारी असलेल्या काही लोकांनी या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात एका विद्यार्थिनीला वाचवण्यात यश आलं. पण जिशान, जिया आणि हर्षल हे वाहून गेले. पोलिसांनी याची माहिती विद्यालयाला दिली. विद्यालयाकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. अवघ्या दोन ते तीन तासांपूर्वी आपल्याशी बोललेल्या मुलांचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाला मोठा हादरा बसला.
जिशान आणि जिया वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात
जिशान पिंजारी आणि जिया पिंजारी हे चुलत भाऊ-बहिण आहेत. एमबीबीएस शिक्षणासाठी हे दोघंही 2023 ज्या जुलैमध्ये रशियात गेले. तिथे त्यांना यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज प्रवेश मिळाला. गेल्या वर्षभरापासून ही मुलं तिथे शिक्षण घेत होती. दररोज आपल्या पालकांना फोन करुन ते अभ्यास कसा सुरु आहे याची माहितीही द्यायचे. पण त्यादिवशीचा फोन त्यांचा शेवटचा ठरला.
खासदार स्मिात वाघ यांनी घेतली कुटुंबियांची भेट
दरम्यान, रशियात बुडून मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील तिन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची निवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी भेट घेतली. कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं. तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर जळगाव जिल्ह्यात आणण्यासाठी आपण पाठपुरावा करु असं स्मिता वाघ यांनी सांगितलं आहे.