महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
उन्हाळी सत्राच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर
किरण ताजणे, नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 15 जुलै पासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. उन्हाळी सत्राच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाहता येईल. ज्या महाविद्यालयात प्रवेश आहे तेथेच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचं म्हणजे वेळापत्रकात नमुद लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्थानिक गावानजीकच्या त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षाकेंद्रावर त्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध असल्यास लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाकेंद्र बदली देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी म्हटलं की, 'विद्यार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळून आपल्या सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय महाविद्यालय वसतिगृहात येऊ नये. शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.
'परीक्षासंदर्भात आवश्यक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या सूचना व बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परीक्षार्थींच्या शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठातर्फे सुरु करण्यात हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. विद्यापीठाच्या उन्हाळी-2020 सत्रातील परीक्षा हया टप्प्या टप्प्याने घेण्यात येणार आहेत. पदवी व पदव्युत्तर परीक्षा हया टप्प्या टप्प्याने घेण्यात येतील, यातून कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुट देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.'
विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वरील माहिती अधिकृत समजण्यात यावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्याशाखानिहाय वेळापत्रकाची प्रत समवेत जोडण्यात आली आहे.