Vidhan Parishad Election : दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सावध, उचललं हे महत्वाचं पाऊल
Maharashtra Vidhan Parishad Election : आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.
मुंबई : Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडे (Mahavikas Aghadi) मतांचा कोटा असताना शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना पत्करावा लागला. कारण महाविकास आघाडीतील आमदारांची मते फुटली होती. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.
विधानपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या आमदारांना पवईतील रेनेसॉ हॉटेलमध्ये ठेवले आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या एका जागेच्या पराभवामुळे शिवसेनेनं यावेळी सावध पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हेही हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी मतदान असल्याने यावेळी कोणता पक्ष बाजी मारतो याची मोठी उत्सुकता आहे. भाजपने आम्ही सगळ्या जागा जिंकणार असा दावा केला आहे. आम्ही आता दुसरी व्युहरचना आखली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चमत्काराची भाषा भाजपकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राष्ट्रवादी (NCP) आणि मविआला (Mahavikas Aghadi) मोठा झटका दिला आहे. राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषदेतही राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदान करता येणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने दोघांनाही मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादीची हक्काची दोन मते कमी झाली आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे. तर भाजपचा या निर्णयाचा फायदा होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.