70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : आर आर पाटील यांनी आपला केसाने गळा कापला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली याबद्दल वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं. संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर कराडचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. सिंचन घोटाळा हा अजित पवारांची पाठ काही सोडत नाही, असं म्हणत मी जेव्हा श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते तेव्हा माझ्या त्या आदेशात 70 हजार कोटी शब्द नव्हता आणि मुळात श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही, असं चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
हेसुद्धा वाचा : 'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'
'(Ajit Pawar) अजित पवारांच्या 2010-2011 च्या आर्थिक पहाणी अहवालामध्ये 70 हजार कोटी खर्च झाले. सिंचनाची टक्केवारी 18.0 वरुन 18.1 झाली हे नमुद केले होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर ते पाहिले, तेव्हा मला धक्का बसला. मी सिंचन खात्याला विचारले, की हे बरोबर आहे का? 70 हजार कोटी खर्च केले, 70 हजार खर्च केले हे अजित पवारांच्याच अहवालात होते आणि सिंचनाच्या टक्केवारीत फार वाढ झाली नाही. म्हणून काय वस्तूस्थिती आहे त्याला अनुसरून अहवाल शासनाला सादर करा हे मी सिंचन खात्याला सांगितले. (Maharashtra Assembly Election)
मला चौकशी करायची असती तर मी ती अॅन्टीकरप्शन विभागाला दिली असती. पुन्हा चुका होऊ नयेत हा माझा त्यामागचा उद्देश होता. नंतर त्याची चौकशी झाली. विधीमंडळात त्याची चर्चा झाली आणि या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा एक अहवाल खालून आला आणि तसा तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला गेला.
पुढे अॅन्टीकरप्शनला त्याची चौकशी करण्याचे आदेश द्या असे लिहिले होते असं सांगत गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर मान्यता दिली याचा उल्लेख आज अजित पवारांनी तासगावच्या सभेत केला. ती फाईल आपल्याजवळ आली नाही. त्या फाइलवर माझी कसलीही सही नाही. त्यामुळे मी सिंचनच्या प्रकरणात कोणतीही चौकशी लावली नव्हती. नाहक माझा बळी घेतला. अजित पवारांनी 2014 ला माझे सरकार पाडले आणि भाजपची मुहुर्तमेढ केली. ही वस्तूस्थिती आहे. ती फाईल मी पुन्हा पाहिली नाही आणि ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्थरावर मान्यता देऊन ती खाली गेली. गृहमंत्र्यांनी कोणाला विचारले का, की स्वत:च्या स्थरावर हे केले याची माहिती नाही. अजित पवार बोलले ते खरं आहे. माझा काय दोष आहे हे जर सांगितले असते तर बरे झाले असते. मी सिंचन प्रकरण असेल वा राज्यसरकारी बँक असेल, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्याचीच शिक्षा मला भोगायला लागली. त्याची मला चिंता नाही, तो 70 हजार कोटीचा घोटाळा होता; 42 हजार कोटीचा घोटाळा होता हे नरेंद्र मोदींनीच तपासून पाहिले आहे. त्यामुळे आता कोणी शिक्कामोर्तब करायची गरज नाही', असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.