Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला वेग आलेला असतानाच नाशिकमध्ये मात्र काहीशी तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. (Nandgaon Assembly Constituency) नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलं. ज्यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे आमनेसामने आले आणि नांदगाव- मनमाड रस्त्यावर एकच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळ आणि कांदे समर्थकांमध्ये यावेळी गुरूकुल कॉलेज परिसरामध्ये मतदार निघालेले असताना दोन्ही गटांमध्ये राडा झाला. मतदानासाठी मतदार निघालेले असताना भुजबळांनी वाहनं वाटेत उभी करत त्यांना अडवलं. परिस्थिती तणावग्रस्त वळणावर येताच तिथं पोलीस आणि निवडणूक आयोगाचं पथक दाखल झालं. थांबवलेल्या मतदारांची यानंतर चौकशी करत त्यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं. वाढता तणाव पाहता पोलिसांनी इथं तातडीनं अतिरिक्त कुमक मागवली. 


भुजबळांनी कांदेंच्या मतदारांना अडवताच नांदगाव- मनमाड रस्त्यावर एकच राडा झाला. कोणत्याही परिस्थितीत मतदार जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेताच कांदे त्यांच्यासमोर उभे ठाकले. 'फिक्स है मर्डर...' असं म्हणत कांदे गटाकडून भुजबळांना धमकी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांमधील विकोपास गेलेला हा वाद शमवण्यासाठी प्रयत्न केले. 


हेसुद्धा वाचा : मतदानाच्या दिवशी, रायगडमध्ये देवदेवस्कीचा प्रकार? रस्त्यावर मडकी रचून ठेवली आणि... 


झाल्या गोंधळादरम्यान मतदारांचाही संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. जिथं, त्यांनी आपलं आधारकार्ड तपासण्याचं आवाहन पोलिसांना केलं. आपण बिहारी नसून, याच मतदारसंघातील असल्याचं सांगत मतदानापासून आम्हाला वंचित ठेवू नका अशा शब्दांत मतदारांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला.