पहाटेच्या शपशविधीनंतर आता निकालही 23 नोव्हेंबरलाच! पुन्हा एकदा राज्यातील समीकरणं बदलणार का?
23 November Political Happening: चर्चेतला पहाटेचा शपथविधी 23 नोव्हेंबर 2019 रोजी झाला होता. आता निकालही 23 तारखेलाच जाहीर होत आहे.
23 November Political Happening: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. आता 23 या तारखेवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. कारण, चर्चेतला पहाटेचा शपथविधी 23 नोव्हेंबर 2019 रोजी झाला होता. आता निकालही 23 तारखेलाच जाहीर होत आहे. त्यामुळे हा अनोखा योगायोग सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
'23' तारखेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यात कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. 23 नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची आहे. कारण 23 नोव्हेंबर 2019 यादिवशी झालेला पहाटेचा शपथविधी आजही राज्यातला चर्चेचा मुद्दा राहिलाय. यंदा याचदिवशी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्यानं '23' तारखेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
अवघं साडेतीन दिवसांचं सरकार
2019सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार, असा पेच निर्माण झाला होता. बरेच दिवस चर्चेचं गुर्हाळ चालल्यानंतर अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांची शपथ घेतली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वाधिक नाट्यमय घडामोडींपैकी एक मानला जातो. पहाटे स्थापन झालेले फडणवीस-पवार यांचं सरकार अवघं साडेतीन दिवसच टिकलं. यामुळे ते संपूर्ण देशभर चर्चेत राहिले. आता पुन्हा एकदा 23 नोव्हेंबर तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरलीय. यंदा याच दिवशी विधानसभा निवडणुकींतर्गत मतमोजणी होणार आहे. याच दिवशी राज्यात सत्ता कोणाची येणार, हेही चित्र स्पष्ट होणार आहे.
दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फूट
यामुळे समाजमाध्यमांसह राजकीय नेत्यांकडून प्रचाराच्या रणधुमाळीत हा दिवस चर्चेत आलाय. 2019 सालच्या निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्रित लढविल्या, मात्र मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावरून या दोन पक्षांमध्ये बिनसलं होतं. शिवसेनेनं भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय घडामोडी वाढल्या. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन सरकार स्थापन केलं. ते अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील फुटीनंतर कोसळलं. यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 23 नोव्हेंबरवरून जोरदार चर्चा सुरू आहे. आता निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातली समीकरणं बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.