मुंबई : कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या (Zilla Parishad) पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्ह्यातील 84 जागा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 38 पंचायत समित्यांतील (Panchayat Samiti) 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी (by-polls) आज मतदान पार पडलं. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. 


त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी आज मतदान झाले. सर्व ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. 


प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी धुळे- 60,  नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65 टक्के मतदान झालं. एकूण सरासरी 63 टक्के मतदान झालं असून ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाला मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.