महाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी... हवामानाचं काय चाललंय काय?
Weather Updates : राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, हे बदल अनेकांनाच हैराण करणारे आहेत. कारण, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
Weather Updates Latest News : हवामानाचा अंदाज पाहूनच घराबाहेर पडण्याला हल्ली अनेकजण प्राधान्य देतात आणि सध्या तेच करणं योग्य ठरत आहे. कारण, सध्या देशातील ऋतूचक्रामध्ये कमालीचे बदल होताना दिसत आहेत. जिथं महाराष्ट्रात जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा कडाक्याच्या थंडीचा होता, तिथंच फेब्रुवारीच्या सुरुवातीला मात्र राज्याच्या काही भागांमध्ये किमान तापमानात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता सध्या (Mumbai) मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यामध्येही किमान तापमानाच काही अंशी चढ उतार पाहायला मिळत आहेत. हवामानात होणाऱ्या या सातत्यपूर्ण बदलांमुळं सध्या नागरिकांना आजारपणालाही सामोरं जावं लागत आहे ही वस्तूस्थिती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमानात चढ- उतार पाहायला मिळणार आहेत. किमान तापमान 9 अंशांच्या घरात राहील, तर पाचगणी (Panchgani), कोल्हापूर (kolhapur), पुणे (Pune) या भागांमध्ये किमान तापमानाचा आकडा 15 ते 18 अंशांच्या घरात राहणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, तापमान कमी-जास्त होत असलं तरीही राज्यातील थंडी काही कमी झालेली नाही ही बाबही तितकीच स्पष्ट. इथं राज्यातच नव्हे, तर देशातही हवामान बदलांना पुन्हा सुरुवात झाली आहे. कारण, दिल्लीमध्ये ऐन थंडीच्या दिवसांत पावसानं हजेरी लावली आहे. तर, पंजाबच्या काही भागांमध्ये तर गारपीटही झाली आहे. पाऊस, धुकं आणि हवेत वाढलेला गारवा यामुळं उत्तर भारतात तापमानात घट नोंदवली जात आहे.
तिथं उत्तरेकडे असणाऱ्या डोंगराळ आणि पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमान प्रचंड कमी झालं असून, काही भागांमध्ये ते उणे 4 अंशांहूनही कमी नोंदवलं गेलं आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार पूर्वोत्तर, मध्य आणि उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीहून कमी असेल. म्हणजेच देशातील किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पाकडेही गांभीर्यानं पाहा, कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या 'या' मोठ्या घोषणा
काश्मीरपासून हिमाचलपर्यंत बर्फाची चादर
काही दिवसांपूर्वी ज्या (Kashmir, Himachal Pradesh) काश्मीर आणि हिमाचलमध्ये ओसाड डोंगररांगा पाहायला मिळत होत्या तिथंच आता बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. काश्मीरमध्ये होणारी हिमवृष्टी पाहता येथील 6 जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, काश्मीरचं खोरं या भागांमध्ये होणारी बर्फवृष्टी आणखी काही दिवस कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.