Maharashtra Weather News : राज्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली असून अंगाची लाही लाही होत असताना हवामान विभागाने उष्णतेची लाट वाढणार असल्याचा इशारा दिलाय. एवढंच नाही तर काही भागामध्ये अवकाळी पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लोकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यात हलक्या सरी येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर शुक्रवारी सोलापूर जिल्हा देशभरात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत नोंद झाली आहे. सोलापूर शहरात शुक्रवारी 43.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


उष्णतेची लाट कायम!


हवामान विभागाच्या इशारानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असेल त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय. 


या ठिकाणी अवकाळी संकट!


राज्यात 7 ते 10 एप्रिलदरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आजपासून 8 एप्रिल पर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर विदर्भामध्ये 7 आणि 8 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


तर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिलनंतर अवकाळी पावसाच संकट कोसळू शकतं असा इशारा हवामान विभागाने दिलाय. या भागांमध्ये हवामाना विभागाने यलो अलर्ट जारी केलाय. 


मुंबईत कसं असेल वातावरण?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अकोला, चंद्रपुर, यवतमाळ इथे पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे, आणि पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, यवतमाळ, मालेगाव, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानची नोंद करण्यात आली आहे. 


पुणेकरांनी घ्यावी काळजी


पुणे आणि परिसरात 8 एप्रिलपर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 9 आणि 10 तारखेला आकाश अंशतः ढगाळ असू शकतं. शिवाय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.