Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; `या` भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारी
Maharahastra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे? घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवामान वृत्त...
Maharahastra Weather News : मान्सूनचं (Monsoon Updates) राज्यातं जोरदार आगमन झाल्यानंतर आता हे नेऋत्य मोसमी वारे राज्याचा बहुतांश भाग व्यापताना दिसत आहेत. गेल्या 48 तासांमध्ये राज्यातील कोकण किनारपट्टी आणि (Mumbai Rains) मुंबई शहर, उपनगर भागात पावसानं जोरंदार हजेरी लावली असून, पुढील 24 तासांमध्ये ही परिस्थिती कायम राहणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच शहराच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ज्यामुळं सखल भागांमध्ये पाणीही साचलं.
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह अमरावतीच्या मेळघाटातही पावसानं हजेरी लावली. पावसामुळे चिखलदऱ्यातही काहीसं धुकं पडलं आणि वातावरणात गारवा पाहायला मिळाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहणार असून, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : मोदी सरकारमधील नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणत्या चेहऱ्यांना संधी? महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुठे देण्यात आलाय यलो आणि ऑरेंज अलर्ट?
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, सातारा, बुलढाणा, नांदेड, वर्धा, नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रबळ झोत अरबी समुद्रावरून पुढे जात असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातही प्रगती करताना दिसत आहे. देशाच्या उर्वरित भागात मात्र मान्सून संथ गतीनं प्रवास करत असून महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्य मात्र इथं अपवाद ठरत आहेत. राज्यात सध्या मान्सून लातूर, धाराशिवपर्यंत पोहोचला असून, छत्रपती संभाजीनगरपर्यंतही त्यानं मजल मारली आहे.
बंगालच्या उपसागरावरून येणारे मान्सून वाऱ्यांचे प्रवाह मंदावले असून, विदर्भात त्यानं अपेक्षित जोर पकडलेला नाही. पण, अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे ही घटही भरून काढताना दिसत आहेत. ज्यामुळं मान्सून पुढील 2 दिवस राज्याताल सुखावह अनुभव देणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.