सगळीकडे नवरात्र आणि दसऱ्याचा उत्साह असताना पावसाने गोंधळ घातला आहे. लोकांनी दसऱ्याच्या खरेदीची लगबग होती. या सगळ्यावर आता पावसाचं सावट असणार आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईत जोरदार पाऊस झाला. रात्री नऊ वाजता पाऊस झाला, मुंबईतील अनेक भागात पाणी साचले. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मुंबईची अवस्था दयनीय झाली आहे. 


दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या शनिवारी मुंबईसह राज्यात विविध राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंचा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा दसरा मेळावा असल्यानं, या दोन्ही मेळाव्यांकडे राजकीय जाणकार, तसंच सामान्यांचंही लक्ष लागलं आहे. मात्र हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढल्या 2 ते 4 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर केला आहे


पावसामुळे वाहतूक कोंडी 



पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, दादर, वरळी, अंधेरी-वांद्रेसह बोरिवलीमध्ये पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. या पावसामुळे या भागात पाणी साचले होते. अंधेरी भुयारी मार्गात पाणी शिरले असून ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे.


29 जिल्ह्यांना अलर्ट 


हवामान खात्याने शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने त्यांना यलो अलर्टमध्ये ठेवले आहे. मुंबईची पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रस्थानानंतर गुरुवारी मुंबईत हा पाऊस झाला.