Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर कमीजास्त होत असतानाच हाच पाऊस सध्या विदर्भाकडून आपला मोर्चा कोकणाच्या दिशेनं आणताना दिसत आहे. तिथं विदर्भातील काही भाग वगळला तर इतर क्षेत्रांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. तर, (Konkan) कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मात्र पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या वाऱ्यांचं कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रुपांतर झालं असून, कोकणासह घाटमाथ्यावरील क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. परिणामी कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये पावसाच्या जोरदार सरींमुळं काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढवताना दिसेल, इथं हवामान विभागानं यलो अलर्टही जारी केला आहे. तर, ठाणे, पालघर आणि मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळेल.
हेसुद्धा वाचा : मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार? रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'आणखी...'
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील आणि शहरासह उपनगरात अधूनमधून मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 26 अंशांच्या घरात राहील.
देशभरातही सध्या पावसासाठी पूरक वातावरण दिसत असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळं ही स्थिती उदभवत असल्याचं सांगितलं जात आहे. परिणामस्वरुप आंध्र प्रदेशापासून ओडिशापर्यंतही कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली असून, दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूचा किनारपट्टी भाग इथं पावसाचा इशारा देण्यात आला आहे.