Maharashtra Weather News : उकाडा वाढला, पण...; मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान हवामानात चिंताजनक बदल
Maharashtra Weather News : उकाडा वाढला; मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच, हवामानाच चिंताजनक बदल
Maharashtra Weather News : हवामान बदलांचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये लक्षणीय बदलांची नोंद करण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानवाढीली नोंद करण्यात आली. ज्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूननं शहरातील बहुतांश भागांमध्ये अवेळी हजेरी लावली, ज्यामुळं अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली.
राज्यात विदर्भापासून कोकणापर्यंत बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिली असतानाच कोकण आणि रायगडमध्ये मात्र ढगांच्या चादरीमुळं वातावरण पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात सध्या सर्वत्र ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला असून, तापमानाचा आकडा 36 अंशांवर पोहोचला आहे. ज्यामुळं उष्णतेचा दाह कायम राण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'
मागील काही दिवसांपासून परतीला निघालेल्या मान्सूननं देशाच्या वायव्येपासून बहुतांश भागांतून काढता पाय घेचला आहे. येत्या काळात मान्सूनचा हाच परतीचा प्रवास आणखी वेगानं सुरु होणार असून, त्यादरम्यान मात्र हवामानात सातत्यानं महत्त्वपूर्ण बदल होताना दिसणार आहेत. सध्या राज्याच्या काही भागांमध्ये पहाटेच्या वेळी धुकं आणि हलक्या गारव्याची अनुभूती होत असली तरीही ही थंडीची चाहूल नाहीय हेही तितकंच खरं.
कमी दाबाच्या पट्ट्यानं वाढवली चिंता
देशाच्या आजुबाजूला सध्या हवामानात होणाऱ्या बदलांनी राज्याराज्यांमध्ये किंबहुना जिल्ह्यामध्येही हवामानात प्रचंड बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आग्नेय बांगलादेश आणि नजीकच्या भागांमध्ये वाऱ्यांची चक्राकार स्थिती असून, यामुळं अंदमानच्या समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शिवाय पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होत असल्यामुळं राज्यात पावसाच्या शिडकाव्याचा अंदाज आहे.