Maharashtra Weather News : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर (Loksabha Election 2024 First Phase Voting) पहिल्या टप्प्यातील मतदान देशासह राज्याच्याही पाच मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. मतदानाच्या निमित्तानं मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडणार असले तरीही राज्यातील हवामानाचा अंदाज पाहता त्यांनी ऊन्हाच्या तडाख्यामुळं होणाऱ्या अडचणींपासून सावधगिरी बाळगतच मतदानासाठी घराबाहेर पडावं, शक्य तितकं लवकरच मतदान करावं अन्यथा सूर्य मावळतीला जाताना मतदान केंद्रांवर जावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या काही भागांमध्ये सध्या वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानंम जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं नंदुरबार, नाशिक तर, मराठवाड्यात नांदेड आणि विदर्भातील बहुतांश भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिथं कोकणातील काही भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 



हवामान विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी, बीड, पुणे, पालघरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा दाहसुद्धा अधिक जाणवणार आहे. तिथं कोकणातील काही भागांमध्ये भागात उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र भागात उष्णतेची लाट येणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि  मराठवाड्यामध्या ताशी 30-40 kmph वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


हेसुद्धा वाचा : Lok Sabha Elections Voting Live Updates: विक्रमी संख्येनं मतदान करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतून आवाहन 


मुंबई, नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये पुढील 24 तासांसाठी मुंबई आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट स्थितीची जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, गुरुवारी पुण्यातील राजकीय तापमानाचा पारा शिगेला पोहोचलेल असतानाच प्रत्यक्षातील तापमानानंदेखील नवीन उच्चांक प्रस्थापित केला. पुण्याच्या हडपसरमध्ये राज्याच्या सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी झाली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा 40 अंशाच्या वर आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच पुण्यात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान जाणवत आहे. पुण्यात गुरुवारी एप्रिल मधील गेल्या दोन वर्षांमधील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर मध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं तर राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद हडपसर मध्ये झाली. हडपसर मध्ये काल 43.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं.