Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत आहे. तसेच राज्याच्या काही ठिकाणी अजूनही अवकाळी पावसाच संकट कायम आहे. अशा परिस्थितीत थंडीची चाहुल कधी लागणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. ढगाळ वातावरणासहित अजुन ऑक्टोबर हिट चा परिणाम महाराष्ट्रात सोमवार दिनांक 4 नोव्हेंबरपर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवत आहे.
फटाक्यांमुळे वातावरण दूषित
राज्यभरात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरण दूषित झाले. या प्रदूषित हवेमुळे मुंबई आणि पुण्यात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर होताना दिसतो.
पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
थंडीची चाहुल
राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान हे 33 अंश सेल्सियस तर किमान तापमान 22 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे, येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण वाढणार आहे.
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.