Maharashtra Weather News : पश्चिमी झंझावात आणि उत्तरेकडून वायव्येच्या दिशेला येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. उत्तरी राज्यांच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणारी हिमवृष्टी आणि त्यातच मैदानी क्षेत्रांमधील तापमान घट या सर्व बदलांचा परिणाम देशाच्या उर्वरित भागांमधील हवामानावर होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या या शीतलहरींमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र गारठलेला असतानाच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात काही बदल अपेक्षित असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील 48 तासांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील दक्षिण किनारपट्टी क्षेत्र प्रभावित होण्यासमवेत महाराष्ट्रावरही ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. ज्यामुळं शनिवारपासून गारठा अंशत: कमी होऊन राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी या बदलांमुळं तापमानवाढ अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. ज्यामुळं आठवड्याचा शेवट बोचऱ्या थंडीनं होणार नसला तरीही गुलाबी थंडी मात्र हजेरी लावताना दिसेल ही बाब नाकारता येत नाही. 


हेसुद्धा वाचा : भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव


कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिणेकडून येणारे हे बाष्पयुक्त वारे राज्यात येऊन रविवारपासून ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढताना दिसणार आहे.  या वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिवमध्ये दिसून येणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होणार असून, यामुळं थंडीचा कडाका कमी होणार आहे.