Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात `इथे` वाढणार गारठा
Maharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
Maharashtra Weather News : चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरलेला असतानाच राज्यात आता मोठ्या विश्रांतीवर गेलेली थंडी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं. पण, आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमान पुन्हा एकदा 10 अंशांहून कमी असल्याचं लक्षात येत आहे. तर, किनारपट्टी क्षेत्र असणाऱ्या कोकणापासून मुंबईपर्यंतसुद्धा तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती पुढील 24 ते 48 तास कायम राहिल्यास निरभ्र आकाश आणि तापमानातील घट पाहता थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याची प्राथमिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तिथं नाशिकमध्ये एका दिवसात तापमानात 4 अंशांनी घट होत आकडा थेट 12 अंशांवर पोहोचल्यामुळं नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरली आहे.
हेसुद्धा वाचा : शिंदे सरकारमधील 6 मंत्री पास; संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास
देशातील हवामानाचा आढावा
राजधानी दिल्लीसह नजीकच्या क्षेत्रामध्ये रविवारी रात्रीपासून पावसाची हजेरी पाहायला मिळाली असून, येथील तापमानात पुन्हा घट झाली आहे. तर, तिथं हिमाचल, जम्मू काश्मीर यांसारख्या राज्यावरून बर्फवृष्टीनंतर वाहणाऱ्या शीतलहरींमुळे मध्य भारतापासून पूर्वोत्तर भारतापर्यंत थंडीचा कडाका लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे.