Maharashtra Weather News : थंडी बॅकफूटवर? राज्याच्या `या` भागात गारपिटीच्या यलो अलर्टनं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : बदलत्या हवामान प्रणालीमुळं महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर परिणाम केला असून, आता महाराष्ट्रावरही या प्रणालीचे परिणाम होताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार नव्यानं तयार झालेल्या एका पश्चिमी झंजावातामुळं गुरुवारपासून पुढील 48 तासांसासाठी राज्याच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिवाळ्याच्या या मोसमात थंडीचा कडाका वाढण्याची अपेक्षा असतानाच या दिवसांमध्ये पावसानं राज्यात धडक दिल्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही एक चिंतेची बाब ठरत आहे. उत्तर महाराष्ट्रही इथं अपवाद ठरला नसून, राज्याच्या या भागांना गारपिटीचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्यामुळं या चिंतेत आणखी भर पडताना दिसत आहे.
अरबी समुद्रातही पश्चिमी झंझावात सक्रिय होत असून, हवेतील आर्द्रता वाढत आहे. त्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणाीची भर पडत असल्यामुळं महाराष्ट्राला पुढील 3 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उत्तरेकडून येणारे शीत वारे आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळं महाराष्ट्रासह मध्य भारतामध्येही थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. तर उत्तर भारतामध्ये मात्र पर्वतीय क्षेत्रांना हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या धर्तीवर हिमाचल आणि काश्मीरच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या भागांमध्ये प्रशासनानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
हेसुद्धा वाचा : 'धन्य तो निवडणूक आयोग' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मागितला 76 लाख मतांचा हिशोब! म्हणाले, 'मोदी-शहांच्या...'
राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांहून अधिक असल्याची नोंद करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या दुपारच्या वेळी ऊन आणि धुरक्याचं साम्राज्य पाहायला मिळत असून ही स्थिती आणखी काही दिस कायम राहणार असून सायंकाळच्या सुमारास तापमानात घट नोंदवली जाईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
तर, तिथं कोकणासह दक्षिण किनारपट्टी भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुंबई शहरात वातावरण अंशत: ढगाळ राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.