Weather update : मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातलं असून, हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीलासुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. किंबहुना तामिळनाडूला पुढील 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कन्याकुमारी, तिरुन्नेलवेल्ली, थूथकुडी आणि तेनकसी या जिल्यांसाठी हा इशारा लागू असेल. इथं महाराष्ट्रात मात्र दक्षिणेकडील हवामानापेक्षा जास्त प्रभाव उत्तरेकडी शीतलहरींचाच असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. काही भागांमध्ये तर जोरदार बर्फवृष्टीही सुरु आहे. परिणामस्वरुप महाराष्ट्राच्या दिशेनं येणाऱ्या या शीतलरहींचा परिणाम राज्यातील तापमानावर होताना दिसत आहे. निफाडमध्ये थंडी वाढली असून, 11.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसांत निफाडसह राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमान 14 अंशांवर पोहोचेल. तर, उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र मात्र या थंडीच्या वातावरणाला अपवाद ठरत असून, इथं तूर्तास किमान तापमानात कोणतीही घट होण्याची चिन्हं नसल्याची बाब समोर येत आहे.


हेसुद्धा वाचा : Coronavirus नं चिंता वाढवली; केरळात एकाच दिवशी 111 रुग्ण आढळल्यानं खळबळ; केंद्र शासनाकडून निर्देश जारी 


देश पातळीवर एकिकडे पावसाचा इशारा देण्यात आलेला असतानाच दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांना मात्र थंडीचा तडाखा बसत आहे. सध्या जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरु असून, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाले आहेत. गुलमर्ग भागात वर्षातील पहिली हिमवृष्टी झाल्यामुळं हा भाग एखाद्या परिकथेतील दुनियेप्रमाणं दिसत आहे. तर, हिमाचल प्रदेशातही स्थिती वेगळी नाही. हिमाचलमधील पर्वतीय क्षेत्रामध्ये सध्या तूफान बर्फवृष्टी झाल्यामुळं राज्यात याचे परिणाम दिसून येत आहेत. उत्तराखंडच्या पर्वतीय भागांवरही बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. देशातील ही थंडीची लाट आता मध्य प्रदेश आणि राजस्थानपर्यंत परिणाम दाखवतेय. ज्यामुळं या भागांमध्ये येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढेल असाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.