राज्यात पावसाची दडी; उन्हाचा तडाखा वाढला, `या` तारखेपर्यंत उकाडा राहणार
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं उष्णतेत वाढ झाली आहे.
Maharashtra Weather Update: जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठल्यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे. मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरात ऑगस्टमध्ये फारसा पाऊस झालाच नाहीये. पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा मात्र चढला आहे. आद्रतेच्या अधिक प्रमाणामुळं मुंबईतील किमान तापमानही चढे आहे.
महाराष्ट्रात जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळं राज्यातील अनेक धरणे 90 टक्क्यांपर्यंत भरली आहेत. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसल्या नाहीयेत. ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडे सरले तरी मुंबईत फारसा पाऊस बरसला नाहीये. त्यामुळंच मुंबईतील उकाड्यात वाढ झाली आहे.
वातावरणात आर्द्रता कायम असतानाच तापमानवाढ झाल्याने मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळं आणखी काही दिवस काहिली कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत उन्हाची काहिली कायम राहणार आहे. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते सहा अंशांपर्यंत अधिक जाणवू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशीव अशा २१ जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच ते सहा अंशांनी अधिक जाणवण्याची शक्यताही वर्तवली आहे.
अरबी समुद्रावरून, पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलून हे वारे सध्या उत्तरेकडून येत आहेत. बाष्पयुक्त वारे वाहत नसल्याने पावसामध्ये खंड पडला आहे. त्यामुळं पावसाने दडी मारली आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्री जमिनीतून आकाशात सामावू शकणाऱ्या उष्णतेलाही सध्या अटकाव होत आहे. पर्यायाने संचित झालेली ही उष्णता काहिलीला मदत करत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.