Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात गारवा पसरलेला आहे. पुढील आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळं उत्तर भारतात गारठा वाढला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. (Weather Update In Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून देशभरातील वातावरणात मोठा बदल होत आहे. मराठवाड्यासह विदर्भातही निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होईल.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. खासकरुन मुंबईसह कोकणात सरासरीइतकी थंडी जाणवेल तर उर्वरीत महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त असेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 10 अंशाच्या खाली राहू शकतं. त्याचवेळी उर्वरीत महाराष्ट्रात किमान तापमान 12 अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे.


फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेच्या वेळेस तापमान सरासरी 14 अंशाच्या आसपास राहू शकते. अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान ८ ते १० डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचे असू शकते. किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार जाणवू शकतात. 


दरम्यान, मुंबईतही थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. पहाटेच्या दरम्यान हवेत गारठा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी पहाटेच्या वेळेस धुकेदेखील जाणवत आहे. पहाटेच्या किमान तापमाना बरोबर दिवसाच्या कमाल तापमानाचाही सरासरीपेक्षा घसरलेला पारा यामुळेच धुके पडत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आणखी काही दिवस हे धुके टिकून राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.