Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय परिस्थिती?
Maharshtra Weather Update : राज्यात मान्सूननं परतीची वाट धरल्यानंतर अवकाळीचं सावट आलं आणि पाहता पाहता या अवकाळीनं शेतकऱ्यांना रडकुंडीस आलं.
Weather Update : महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पावसानं उसंत घेतली असून, तिथं तापमानात काही अंशी घट नोंदवली जात आहे. पण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र चित्र वेगळं आहे. मान्सूननं परतीची वाट धरली आणि तो हद्दपारही झाला. पण, त्यामागोमागच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झालं. परिणामी महाराष्ट्राच्या विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याच धर्तीवर या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्टही देण्यात आला आहे. (maharashtra weather updates unseasonal rain predictions and cold wave in north india )
सध्या आग्नेय राजस्थान आणि पश्चिम महाराष्ट्रावर असणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळं या भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. पण, श्रीलंकेच्या किनारपट्टी भागामध्ये चक्रिय वारे कायम असल्यामुळं त्याचे भारताच्या किनारपट्टी भागापर्यंत काय परिणाम दिसतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तिथं सातारा, सांगली भागामध्ये अवकाळीचा जोर ओसरून हवेत गारवा निर्माण होणार आहे.
शेतपिकांचं नुकसान
कोल्हापूर शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळं ऐन साखर कारखाना गळीत हंगामात पाऊस आल्याने गळीत हंगाम थांबण्याची शक्यता आहे. आधीच कारखान्याचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला त्यात अवकाळी पावसामुळे साखर कारखानदार चिंतेत आहेत. शेतपिकांचंही या अवकाळीनं मोठं नुकसान केलं आहे.
हेसुद्धा वाचा : भारत गौरव ट्रेमधील तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा; पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेत घडला प्रकार
देश पातळीवरही हवामानात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस देशाच्या तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात धुक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं दृश्यमानता कमी असेल. देशाच्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडताना दिसणार असून, किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात येईल.
काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अती डोंगराळ भाग आणि पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टी पाहायला मिळेल. तर, या शीतलहरीचा परिणाम मैदानी क्षेत्रांमध्येही दिसून येईल. ज्यामुळं पर्यटनाच्या हेतूनं देशाच्या या उत्तरेकडील राज्यांमध्ये येणाऱ्यांना मात्र अल्हाददायक थंडीचा अनुभव घेता येणार आहे.