रायगड : युतीबाबत भाजपसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेत स्पष्ट केले. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे भ्रमाचे भोपळे वाटले जात असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. तसंच लोकशाहीत सत्तांध झालेल्या हत्तीवर अंकूश ठेवण्याचं काम शिवसेना करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. राज्यात थापांचा सुकाळ असून सत्ताधाऱ्यांच्या गाजराचं पीक जोमात असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 


राममंदिराबाबत अयोध्येला जाऊन मोदींना प्रश्न विचारणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिर हासुद्धा निवडणुका जिंकण्यासाठीचा एक 'जुमला' होता, असे जाहीर केल्यास २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या २८० वरून २ वर आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन  उद्धव ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केले.