श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : सासू-सुनेची अनेक भांडणं आपण ऐकत असतो,पहात असतो. पण यवतमाळमध्ये सासू-सुनेच्या भांडणातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी थंड डोक्याने सुनियोजित कट रचत एका सुनेने आपल्या सासुचा काटा काढला. ही घटना आहे, यवतमाळमधील आर्णी इथली. सरोज पोजरवार या महिलेला सासूची निर्घृण हत्या केल्याचा आरोपात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


असा रचला हत्येचा कट
सरोज पोजरवार हिची आपल्या सासूबरोबर नेहमी भांडणं होत होती. यातूनच सरोजने आपल्या सासूचा काटा काढण्याचा कट रचला. पोजरवार यांच्या घराजवळ निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर राहतात. ३ दिवसांपूर्वी सरोजने शिताफिने त्यांचं रिव्हॉल्व्हर चोरलं. या चोरीची तक्रारही दाखल झाली होती.


काही दिवसांपूर्वी सरोजची सासू आशा पोजरवार अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांच्या डोक्यातून रक्त येत होतं, पडल्यामुळे सासूला लागल्याचा बनवा सरोजने रचला. आशा यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी आढळून आली. मग पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि सरोजचा बनाव उघड झाला. 



तापट स्वभावाच्या सरोजची सासूसोबत कायम भांडणं होत असत. मात्र घरगुती कुरबुरींवरून सरोज या थराला जाईल याची कल्पना कुणीही केली नव्हती. अत्यंत थंड डोक्यानं तिनं सासूला संपवलं. सासू सुनेचं भांडण थेट हत्येपर्यंत गेल्यानं यवतमाळ जिल्हा हादरला आहे.