Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील...असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या (Maharashtra) तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीचा नाद आता जीवावर बेततो की काय, असच वाटू लागलंय. गौतमीचा कार्यक्रम म्हंटला की राडा, हुल्लडबाजी, गोंधळ हे नित्याचच झालं. मात्र वैजापूरच्या (Vaijapur) महालगावातील चित्र धक्कादायक होतं. इथं गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकं एका दुकानातील पत्र्यांच्या शेडवर चढले होते. गर्दी इतकी वाढली की ही शेडच कोसळली. या गोंधळात 8 ते 10 लोक जखमी झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमीच्या कार्यक्रमात धुडगूस
गौतमीच्या इतर कार्यक्रमांमध्येही असे प्रकार बऱ्याचदा घडलेत. पुण्याच्या खेड (Pune Khed) तालुक्यातील बहिरवाडी इथं गौतमी तिचा डान्स सुरू असताना प्रेक्षकांनी धुडगूस घातला. अखेर या हुल्लडबाजांना रोखण्यासाठी गावातील महिलांनाच हातात दांडुक घ्यावं लागलं. अहमदनरच्या श्रींगोद्यातही गौतमीच्या चाहत्यांनी असाच धुडगूस घातला. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पारनेर तालुक्यातल्या जवळे गावात गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक ग्रामपंचायतीनं बांधलेल्या गाळ्यांवर चढले, आणि अवघ्या काही क्षणात हे पत्रे तुटले.


हीच का महाराष्ट्राची संस्कृती?
नगरच्या राहत्यात तर कहरच झाला. गौतमीनं डान्स थांबवल्यानं प्रेक्षकांनी एकच गोंधळ केला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला. अतिउत्साही प्रेक्षकांना आवरताना 60 बाऊन्सरसह आयोजकांची दमछाक झाली. हा सगळा राडा पाहिल्यानंतर गौतमीच्या कार्यक्रमातून खरंच मनोरंजन होतंय की जिवाशी खेळ सुरूंय असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. गोंधळ, राडा, हुल्लडबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मनोरंजनाच्या नावावर सुरू असलेल्या या थिल्लर प्रकाराला कुठे तरी चाप बसायलाच हवा.


कोण आहे गौतमी पाटील
आज संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलचं नवा परिचीत आहे. गौतमी पाटील ही मुळची महाराष्ट्रातल्या धुळ्यातली. धुळ्यातल्या शिंदखेडा गावात गौतमीचा जन्म झाला. गौतमी लहान असतानाच तिच्या वडिलांनी आईला सोडून दिलं. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा इथं लहानाची मोठी झाली.  आठवीला असताना पोटा-पाण्यासाठी गौतमीचं कुटुंब पुण्यात आलं. आई छोटी-मोठी कामं करूनच मुलांचा सांभाळ करत होती. पण आईचा अपघात झाला आणि सर्व आर्थिक गणितच बिघडली. घराची जबाबदारी गौतमीवर पडली. गौतमीला नृत्याची आवड असल्याने तिने लावणीमध्ये करिअर करायचं ठरवलं. 


गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी सादर केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. लावणी क्षेत्रात पूर्वी आपल्या संपर्कातील कुणीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली.