मुंबई : लॉकडाऊनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अत्यावश्यक वगळून इतर उद्योग जवळपास बंद होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योग पुन्हा सुरु झाले. त्यानंतर आता अनेक जिल्ह्यातील औद्योगिक परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे स्थलांतरीत मजुरांच्या जाण्याने निर्माण झालेल्या जागांवर भुमिपुत्रांनाच संधी देणार आहे. त्यासाठी नोकरी मेळावा व भरती प्रक्रिया कार्यक्रम अनेक जिल्ह्यात सुरु होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि गरजूंना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने  ‘महास्वयंम’ वेबपोर्टल सुरु केले आहे. रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. गरजूंनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध उद्योग क्षेत्रामधील कामगार स्थलांतरित झाले आहेत.  या पार्श्वभूमीवर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बळकटी देण्यासाठी ‘महास्वयंम’ https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे, उमेदवारांची यादी, नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येते,  असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.


या वेबपोर्टलच्या वापरातून सूक्ष्म, लघु ,मध्यम  आणि मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापना निशुल्क कुशल/अकूशल मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे. अधिकच्या माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक आणि  इतर आस्थापना विभागांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. शं. पवार यांनी दिली. उमेदवारांना (Job Seeker) किंवा  उद्योजक आणि इतर आस्थापना विभागाला नोंदणी करताना, पोर्टलवर आणि जागा पोस्ट करताना काही अडचणी येत असतील, तर या कार्यालयाच्या   sindhudurgrojgar@gmail.com ई-मेल पत्त्यावर, दूरध्वनी क्रमांक 02362-228835 किंवा या कार्यालयाचे प्रतिनिधी नामदेव सावंत मोबाईल- 9403350689 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


सातारा येथेही रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या वतीने १८ व १९ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदवा, असे आवाहन सातारा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे आणि सातारा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,  सहायक आयुक्तसचिन जाधव यांनी केले आहे.


तर सोलापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, ड्राईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, पार्क चौक, (नॉर्थकोट) सोलापूर, येथे प्रत्यक्ष अथवा 0217-2622113 या क्रमांकावर अथवा solapurrojgar@gmail.com या ईमेलदवारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.