Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024: महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला. हा अखेरचा हाय व्होल्टेज टप्पा गाजला तो वादंगाच्या प्रसंगांनी. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते आमने-सामने आल्याने दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात वाद झाल्यानं घटनास्थळी पोलीस दाखल झाले. हा सगळा प्रकार नाशिकच्या भद्रकाली हद्दीत घडलाय. (Lok Sabha Election 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे भांडूपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झालाय. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना तंबी दिलीय. कार्यकर्त्यांना अटक करू नये, असंही त्यांनी पोलिसांना बजावलंय. तर पराभवाच्या भीतीने रडीचा डाव सुरू असून, कायदा हातात घेणा-यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदेंनी दिलाय.


तिकडे ओशिवरामध्येही भाजप व ठाकरे गटामध्ये वाद झाला. भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेल्याचा आरोप ठाकरे गटानं केल्यानं खळबळ उडाली. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्यात. भरउन्हात रांगेत उभं राहावं लागल्याने नागरिकांचा संताप झाल्याच्या घटना घडल्यात. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आता निकालात कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये सोमवारी सरासरी 56.68 टक्के मतदान झालंय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के तर सर्वात कमी 48.66  टक्के मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी या मतदारसंघांचा समावेश आहे.