शरद पवारांची तंबी, तरीही सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले `अजितदादांना खलनायक...`
Sunil Shelke On Rohit Pawar : खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) तंबी दिल्यानंतर देखील शेळकेंनी रोहित पवारांना निशाणा लगावला आहे.
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीपुर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आक्रमक रुप धारण केलंय. लोणावळ्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला. लोणावळ्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (MLA Sunil Shelke) धमकावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तेव्हा आपल्या खास शैलीत पवारांनी आमदार शेळकेंना चांगलंच फैलावर घेतलं. मला शरद पवार म्हणतात, खबरदार इथल्या कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी कराल तर... असा शब्दात शरद पवारांनी सनील शेळकेंना चांगलंच झापलं. अशातच आता खुद्द पवारांनी तंबी दिल्यानंतर देखील शेळकेंनी रोहित पवारांना (Rohit Pawar) निशाणा लगावला आहे.
रोहित पवारांवर पुन्हा निशाणा
पवारांशी वाकडं म्हणजे थेट नदीवर लाकडं... त्यामुळं आमदार शेळके नरमले नसते तरच नवल... आपण कुणालाही धमकावलं नाही, कुणी पुराव्यानिशी धमकावल्याचं सिद्ध केलं तर माफी मागण्याची तयारी त्यांनी दाखवली. शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर आमदार सुनील शेळके यांनीही पत्रकार परिषद (Sunil Shelke PC) घेतली. त्यावेळी त्यांनी मेळावा अपयशी ठरल्याचे खापर स्वतःवर फुटू नये, असं वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर देखील निशाणा साधला. एकीकडे अजितदादांकडून मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात बंड करायचं, हे प्रकार रोहित पवारांनी थांबवावेत, अशी टीका सुनील शेळकेंनी केली.
रोहित पवार जबाबदार
जयंत पाटील दुसऱ्या पक्षात गेले तर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार कारणीभूत असतील, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. रोहित पवार यांच्यावर टीका केल्याने शरद पवार यांनी तुम्हाला सुनावलं का? असा सवाल विचारला गेला तेव्हा, मी रोहित पवारांच्या बाबतीत जे आरोप करतो, त्याचा साक्षीदार मी देखील आहे, त्यामुळे सात्त्यानं अजितदादांना तोंडघडी पाडणं अन् त्यांना खलनायक करणं कितपत योग्य आहे? असा सवाल सुनील शेळके यांनी विचारला आहे.
शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले धोरणी आणि चाणाक्ष राजकारणी... ज्यांनी ज्यांनी पवारांशी पंगा घेतला त्यांना ते महागात पडलंय, हा राजकारणातला आजवरचा अनुभव... त्यामुळं भले भले पवारांच्या वाट्याला जात नाहीत. लेकी बोले, सुने लागे... ही म्हण सर्वांनाच माहित आहे. शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना खडसावलं असलं तरी त्यांचा निशाणा दुसरीकडेच होता, असं बोललं जातंय. त्यामुळे समझनेवालों को इशारा काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.