Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. रविंद्र धंगेकर यांच्या आरोपामुळे आता पुण्याचं वातावरण तापलं असताना आता धंगेकरांनी तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधलाय. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी रविंद्र धंगेकरांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले रविंद्र धंगेकर?


ससूनमध्ये घडलेले ललित पाटीलचे ड्रग्स प्रकरण असो की रुग्णवाहिका खरेदीतील गैरव्यवहार असो अनेक आंदोलने होऊन देखील अधिकारी निलंबित करण्यात आले नाही, पण जे प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांना पाहिजे तसे नियमबाह्य पद्धतीने कामकाज करत नसतील तर त्यांचे थेट निलंबन करायचे, असा नवा कारभार राज्य सरकारच्या आरोग्य विभागात सुरू आहे, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केलाय.


सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी भगवान पवार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून सरकारच्या आरोग्य विभागाने त्यांना कुठलेही ठोस कारण न देता थेट निलंबित केले आहे. ते दबावाला बळी पडले नाहीत म्हणून त्यांना थेट घरी पाठवण्याची घटना सरकारसाठी लाजिरवाणी आहे, असंही रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.



दरम्यान, मद्यप्राशन करून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या आरोपीला केलेल्या या शिक्षेमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली. अपघात प्रकरणानंतर पुणेकरांच्या भावना निबंधाच्या स्वरूपात बाहेर पडाव्यात याकरिता उपहासात्मक पद्धतीने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन पुणे शहर, युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेला उपस्थित राहत सहभागी स्पर्धकांशी धंगेकरांनी संवाद साधला होता.