Maharastra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर प्रकरण निवळेल, असं बोललं जात असतानाच उद्धव ठाकरेंनी चुकीला माफी नाही, असं ठणकावलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा पारा आणखीच वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मविआच्या निषेध आंदोलनात उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरत शिवद्रोही सरकार असल्याचा घणाघात केला. राज्य सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया म्हटलं पाहिजे असा थेट इशाराच ठाकरेंनी दिला. यावर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला जनतेनं 2 वर्षांपूर्वीच गेट आऊट केल्याचा टोला शिंदेंनी लगावला.


राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळल्यावरून मविआनं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत जोडो मारो आंदोलनात मविआचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह मविआचे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. मविआच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  


एकीकडे शिवरायांच्या पुतळ्यावरून मविआनं राज्य सरकारला जाब विचारलाय. त्याचवेळी राज्यभरात महायुतीच्या वतीनं मविआविरोधात आंदोलनं करण्यात आली. मविआ छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप करत महायुतीनं मविआविरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलनं केलीयेत. कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने शिवरायांचा पुतळा पाडल्याच्या घटनेचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. 


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणावरून राज्यातलं राजकारण तापलंय. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी याच मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. येत्या निवडणुकीत या मुद्याचे कसे पडसाद उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.