Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?
Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Nawab Malik Will contest as an independent : नवाब मलिक... राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार... मात्र आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची तयारी मलिकांनी सुरू केल्याचं समजतंय. झी २४ तासला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.केवळ नवाब मलिकच नाहीत, तर त्यांची कन्या देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं समजतंय. सना आणि निलोफर या दोघींपैकी एकीला निवडणुकीत उभं करण्याच्या हालचाली मलिकांनी चालवल्याचं समजतंय.
दुसरीकडं नवाब मलिक हे राष्ट्रवादीसोबतच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातोय. पक्षाच्या वतीनं आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात प्रफुल्ल पटेलांनीच तसे संकेत दिलेत. विधानपरिषद निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते. मुंबईतून हमखास निवडून येणारा आमदार म्हणून मलिकांकडं पाहिलं जातं. दरम्यान, मलिकांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
नवाब मलिक मनानं राष्ट्रवादी अजित पवार गटात असले तरी महायुतीमध्ये त्यांना अधिकृत एन्ट्री मिळालेली नाही.भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वादामुळं मलिकांना महायुतीचे दरवाजे बंद झाले. हा वाद नेमका काय आहे, ते थोडक्यात पाहूया...
काय आहे मलिक-फडणवीस वाद?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा वाद रंगला होता.ड्रग्ज रॅकेटशी संबंधित एका व्यक्तीनं अमृता फडणवीसांच्या गाण्यांच्या अल्बमसाठी पैसे गुंतवल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यामुळं देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपीसोबत मलिकांचे कसे आर्थिक व्यवहार होते, याचा गौप्यस्फोटच फडणवीसांनी केला.त्यानंतर मलिकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. या प्रकरणात मलिकांना जेलमध्ये जावं लागलं. जेलमधून सुटल्यानंतर मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी जोरदार विरोध केला. मलिकांना महायुतीत घेऊ नये, असं अधिकृत पत्रच त्यांनी अजित पवारांना पाठवलं.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर अजित पवारांची महायुतीत कोंडी होऊ नये, यासाठी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा पर्याय मलिकांनी स्वीकारल्याची चर्चा आहे. मात्र घड्याळ चिन्ह नसल्यास अणुशक्तीनगरची जनता मलिकांना स्वीकारणार का, हा खरा प्रश्न आहे.