शिवरायांच्या अवमानावरून मविआचा आक्रमक पवित्रा, 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुणे बंदची हाक, पुणे बंदला मुस्लीम संघटनांनीही दिला पाठिंबा
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानाचा वाद शमायला तयार नाही. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येत्या 13 डिसेंबरला पुणे बंदची (Pune Band) हाक देण्यात आलीय. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadhi) पुरोगामी विचाराच्या पक्ष आणि संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात शिवजागर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आलीय.
पुणे बंदची हाक
महाविकास आघाडीसह पुरोगामी विचाराच्या पक्ष आणि संघटनांकडून बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस.एस.पी. एम.एस. शिवाजीनगर इथं ही बैठक पार पडली. या बैठकीला मुस्लिम संघटना (Muslim Organizations) त्याचबरोबर इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांची बदनामी यापुढील काळामध्ये सहन करून घेतली जाणार नाही जे बदनामी करतील त्यांच्या घरावरती न सांगता आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमी संघटनांनी दिला आहे.
पुणे बंदला मुस्लिम संघटनांचा पाठिंबा
शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी मुस्लिम संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. पुणे बंदला मुस्लीम संघटनांनीही या पाठिंबा दिलाय. पुण्यातील 300 मशीदीमध्ये पुणे बंदसाठी आवाहन करण्यात येणार आहे. जमीयत ए उलेमा हिंद संघटनेनं हा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य केलं होतं. यालाही मुस्लिम समाज उत्तर देणार आहे. मुस्लिम संघटनांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा असणार आहे.
कोल्हापूरात आंदोलन
सीमा प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी 10 डिसेंबरला कोल्हापुरात शाहू समाधी स्थळांवर आंदोलन करण्याची घोषणा कोल्हापुरातल्या मविआनं नेत्यांनी केलीय. कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणाऱ्या आत्याचारविरोधात विचारविनिमय करण्यासाठी मविआची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, काँग्रेस आमदार जयश्री जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते.