दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्यात भाजप सरकारच्या काळात विविध उद्योगांबरोबर झालेल्या २० ला़ख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांचा महाविकास आघाडी सरकारने फेरआढावा घेणं सुरू केलं आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 'झी २४ तास'ला ही माहिती दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच जगभरातील विविध उद्योजकांबरोबर १६ हजार कोटी रुपयांचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नाहीत, तर हे उद्योग प्रत्यक्ष जमीनीवर उतरणार आहेत, असा दावा देसाई यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भाजप-शिवसेना युतीचं सरकार असताना २०१६ साली मेक इन इंडिया अंतर्गत राज्यात ८ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते. तर मॅग्नेटिक महाराष्ट्रातंर्गत १२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते. देशातील तसंच परदेशातील विविध उद्योगांबरोबर हे करार झाले होते. यातील काही करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आणि उद्योग उभे राहिले. 


मात्र अनेक करारांची अंमलबजावणी झाली नाही. त्याचा फेरआढावा घेण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने सुरू केलं आहे. जुन्या करारांचा फेरआढावा घेण्याबरोबरच त्याचा पाठपुरावाही केला जाणार आहे. या करारानुसार उद्योग सुरू व्हावेत असा आमचा प्रयत्न असल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.



यापूर्वी झालेले करार मोठ्या सोहोळ्यात, औद्योगिक मेळाव्यात, परिषदांमध्ये झाले होते. त्यामुळे तेव्हा छाननी करायला वेळ मिळत नाही, जे येतात त्यांच्याबरोबर करार केले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि झालेले करार यात फरक पडतो, असं याबाबत बोलताना देसाई म्हणाले.


यावेळी मात्र आम्ही उद्योगांबरोबर करार करताना भरपूर वेळ दिला, अनेक महिने मेहनत घेतली, त्यामुळे यातील एकूण एक करारानुसार उद्योग सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मागील सरकारच्या काळात परदेशी कंपन्यांबरोबर झालेल्या ज्या करारांची अंमलबजावणी झाली नाही, त्या देशातील महावाणिज्य दूतांशी आम्ही संपर्क करत आहोत, त्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या असल्याचं देसाई यांनी सांगितलं.