`महावितरण`चा भोंगळ कारभार, भरमसाट बिलामुळे नागरिकांमध्ये रोष
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेची बिलं महावितरणकडून आकारली जात आहेत. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची? असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना भरमसाट बिल पाठवलं आहे. काही ग्राहकांना तर १० हजार रुपयांची वीज बिलं आली आहेत.
अनेक ग्राहकांनी सरासरी वीज बिलंही भरली, तरीही महावितरणने त्यांना मोठ्या रकमेची वीज बिलं पाठवली. याबाबत महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा केला, तेव्हा कमी मनुष्यबळाचं कारण देत टोलवलं जातंय.
कमी-अधिक फरकाने प्रत्येक वीज ग्राहकाची हीच तक्रार आहे. ग्राहक जे बिल असेल ते भरायला तयार आहे. पण ते वीज बिल नेमकं आणि अचूक असावं, हीच ग्राहकांची अपेक्षा आहे.