महावितरणाचा कल्याण-डोंबिवलीकरांना शॉक, बिल कमी करण्यासाठी मोठी गर्दी
महावितरणाचा कारभार पाहून नागरिकांचा संताप
आतिष भोईर, कल्याण : लॉकडाऊनच्या काळात नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महावितरण वीज कंपनीने ग्राहकांना सरासरी बिल पाठविले आहे. परंतु महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सात ते आठ पट जास्तीचे बिल पाठविले गेले आहे. त्यामुळे संतप्त नागरीकांची कार्यालयात बिल कमी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर अनेक जण आर्थिक संकटात आहेत. नागरिक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. काम, व्यवसाय बंद असल्याने आधीच नागरिकांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. परंतु आता अनलॉक वन सुरु झाला आणि महावितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना सरासरी बिल पाठविले होते. मात्र आता पाठवण्यात आलेली नविन बिलं ही वापरलेल्या युनिट पेक्षा ही अधिक आहेत. अशा ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत.
सध्या सात ते आठ पटीने बिल आल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्षात वीजेचा वापर कमी असतानाही वाढून आलेलं वीजबिलं कमी करण्यासाठी नागरिकांना कार्यालयात जावं लागत आहे. पण या ठिकाणी ही गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.